सोमवार, २५ मार्च, २०१९

 

 

 

 

 

माझं असणं ,माझं नसणं मला माझ्यापुरतं ठेवायला आवडतं.

सहजी माझ्या अंतरंगात मी कुणालाही प्रवेश देत नाही.

तो भाग मी कायमच अबाधित ठेवलेला असतो. 

प्रत्येकाचंच भावविश्व वेगवेगळं असतं,

दिसायला काहीही दिसो पण 

मनाची घालमेल प्रत्येकवेळी ओठावर आणता येत नसते.

या भावना ज्याच्या त्यानं समजून घ्यायच्या असतात. 

समजण्याची पातळी मात्र आपल्याला समजायला हवी

 नाहीतर अर्थाचा अनर्थ म्हणा 

की

रंगाचा बेरंग म्हणा 

पण व्हायला वेळ लागत नाही. 

जुळलेल्या तारा असतील तरच सुराला लय सापडते. 

सगळ्याच गोष्टी काही जगाला दाखवता येत नाहीत. 

जगापुढे केविलवाणं असणं म्हणजे आपलं हसू करून घेण्यासारखं असतं. 

आणि 

हे मात्र जो तो आपापल्या परीने टाळत असतो......

 

 

 

 

                                                                  _दत्तात्रय उदारे.

 

 



शनिवार, ९ मार्च, २०१९

" तृप्ती "

                   

 

                     तीच तू अन् तोच मी 

             पण 

            प्रत्येक भेटीत वेगळी 

            आणि 

            वेगळीच भासत आलीस 

            तू मला.

          जितकी तू मला माझी वाटत गेलीस तितकीच तू मला हवीहवीशी वाटत गेलीस. काही क्षण सरुच नयेत असं वाटतं नं त्यापैकीच हे क्षण असतात;पण ते मात्र पंख लावल्याप्रमाणे उडून जातात. तुझ्या सहवासात राहायची खूप इच्छा असते;राहतोही आपण.... पण मन भरत नाही.

                               भरेल ते मन कसलं,सदाच ते तुझ्या सहवासाला आतुरलेलं असतं.तुला ते माझ्या डोळ्यात दिसतही असेल पण तू ते बोलणार नाहीस आणि मी ते लपवणार नाही.आता काय आणि कसं लपवायचं तुझ्यापासून.तुझ्या अस्तित्वानं ओलं झालेलं मन तुला जसं वाचता येतं तसंच ते मला लपवताही येत नाही आणि मी लपवतही नाही.   

                        कायमच पुढच्या भेटीची वाट पाहण्यास मन अधीर असतं, पुरेपूर वेळ एकमेकांना देऊनही काहीतरी बाकी राहील्याची जी हुरहूर असते ना ती त्या मनांना माहित असते जे एकमेकांच्या सहवासासाठी धडपडत असतात. खरंच मानवी मनाला जी तृप्तीची ओढ असते ती तृप्ती लाभत असेल का कधी....कारण तृप्तीचं समाधान फार काळ टिकत नाही.....मन कायमच तुझ्याबाबतीत अतृप्तच राहतंय.....

    


                                    _दत्तात्रय उदारे.






सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

आठवणींचं ओझं...


आठवणींचं ओझं...


                      सूर्य मावळतो मावळताना तो खूप मनमोहक भासतो पण तुझ्याइतका नाही. नजरेत सौंदर्य भरतं ते "ती" चं तिच्यापेक्षा काही सुंदर  असू शकतं हा विचारसुद्धा मनाला शिवत नाही. अशी जादू असते ती... त्या प्रेयसीची. अप्सरा जरी समोर उभी राहीली तरी तिचं सौंदर्य फिकं पाडण्याची ताकद असते ती "तिच्यात".

              एका नजरेसाठी  जीवाची होणारी घालमेल शब्दांत सांगून कळत नसते. त्यासाठी प्रेमाची जादू अनुभवावी लागते. कारण प्रेम ही वर्णनाची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. फक्त त्या प्रेमात वासना नसावी. प्रेम मिळवण्याची इच्छा असावी पण ती लालसा नसावी. निर्व्याज प्रेमाचे क्षण अनुभवले तर ते कळतात नाहीतर आजकाल पाहतो तसे प्रकार घडतात.

                        आपल्या माणसाला सुखात पाहणं हेसुद्धा प्रेम असतं हे आजच्या पिढीला कसं कळणार; कारण आजची पिढी पूर्णपणे भोगवादी आहे. त्यागात प्रेम असू शकतं हा विचार रुजायला हवा.; तो रुजतोही पण तेवढी विचारांची उंची असायला हवी.

                         बघण्यात मिळणारा आनंद हा प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा कितीतरी मोठा असतो. अचानक झालेली नजरानजर किती सुखावून जाते हे शब्दात नाही हो सांगता येणार....



    

                                             _श्री.दत्तात्रय उदारे.



सोमवार, २८ जानेवारी, २०१९

"पाहुणा गोजिरा"

आम्ही इयत्ता  तिसरीत असू तेंव्हा ......

              चौथीत जाण्याची प्रचंड ओढ लागलेली कारण आम्हाला 

तिसरीत असणाऱ्या कवितांपेक्षा चौथीला असणाऱ्या कविता खूप 

आवडायच्या. तिसरीच्या वर्गात बसून आम्ही चौथीच्या वर्गात मुले 

तन्मयतेनं गाणारी कविता ऐकायचो. मधल्या सुट्टीत आशाळभूत 

नजरेनं कविता अन् चित्र निरखायचो .

एक वेगळीच मनाला हुरहूर लावणारी भावना निर्माण व्हायची. 

कधी एकदा आम्ही चौथीला जातोय आणि ठेक्यात कविता म्हणतोय 

असं वाटायचं. आजच्यासारखंच तेंव्हाही उद्याची ओढ जास्त होती.

     वय वाढत जातं आणि असं वाटायला लागतं की आता 

गतकाळात जाता येईल का वय कमी करता येईल का

अजून तरुण होता येईल का ?  

अगदी वर्गात बसून "पाहुणा गोजिरा" कविता गाता येईल का

मनाचं काय हो त्याला काहीही वाटतं .......

                     काहीच नाही करता आलं तरी निदान कविता तरी 

निश्चितच गुणगुणता येईल.


                                            _दत्तात्रय उदारे. 



                                                           पाहुणा गोजिरा

 

आज ये अंगण,पाहुणा गोजिरा

           ये घरा आमुच्या,सोयरा साजिरा || धृ ||

           वाजता नौबती,

           ये सखा सोबती,

          खेळवा संगती,हा जरा लाजरा || ||

           कोवळे देहुडे,  

           सावळे रुपडे

       पोपटी अंगडे,शोभते सुंदरा || ||

           हा वसंतासवे, 

           सृष्टीला हासवे 

            पालवे बोलवे,सानुल्या पाखरा || ||

                          श्रावणी न्हातसे 

                 अश्विनी गातसे  

            साउली देतसे भूमिच्या लेकरा || ||

                   बासरी ऐकतो,

                    चांदणे झोकतो,

              नाचतो,डोलतो,झोंबतो अंबरा || ||

                        गीत गाता मुखी,

              नाचवा पालखी

               छत्रछायाकृती मित्र आला घरा || ||

                                                                            

 

 

                                                                                                                  _बाबा आमटे 

 



मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

आपल्या नजरेतून आपण दुनियेला पाहतो 

आणि

सगळा गुंता वाढीला लागतो.

असेल मनाचा गोंधळ पण तो कुठेतरी 

थांबवताही आला पाहीजे;नाहीतर होत्याचं 

नव्हतं व्हायला वेळ लागत नाही.

समोरच्याला सावरायचं असेल तर काही गोष्टी 

वेळेत आवरता आल्या पाहीजेत 

नाहीतर 

बरेचदा वेळ निघून जाते आणि आपण 

जागे होतो मग अशावेळी आपल्या हाती 

काहीच लागत नाही.

मनाचा खेळ मनानेच थांबवावा हे योग्य.....

                


                                      हा कसला करतेस खेळ 
                                      नाही कुणाला कुणाचा मेळ
                                      बघ आणि काढ जरा वेळ
                                      नाहीतर होईल आयुष्याची भेळ.....

                                                        

 

 

                                                                                     _दत्तात्रय उदारे.

 

 






सोमवार, १४ जानेवारी, २०१९

सगळ्या गोष्टी मनात असतात त्या ओठावर कधी येतील हे सांगता येत नाहीत.मनातल्या गोष्टी ओठावर येण्यासाठी अगदी आयुष्यही अपुरं पडतं.ओठांची अगतिकता शब्दात सांगता येत नाही ती मनाच्या पातळीवर समजून घ्यावी लागते.




बेभान वारा सुटला की,

माळरानावर तुझ्यासोबत

भटकायला आवडतं मला.

तुही असतेस बिलगलेली मला

बोचतो ना तुला तो थंडगार वारा

पण तरीही हट्ट असतो तुझा

माझ्यासोबत फिरण्याचा

कललेला सूर्य तुझ्या संगतीने पाहण्यात

एक वेगळंच थ्रील असतं बघ

शब्दात नाही मांडता येणार

पण असते अगं अशी ओढ

जाणवते तुलाही ती

पण खट्याळपणे वेदावातेस तू मला

मला माहित असतं

तुझं ते मिथ्थ्या समर्थन

केलेली वरवरची बोळवण

करतो मग मी थोडासा आग्रह

तुही माझं मन राखल्याचं दाखवत

होतेस तयार येण्यासाठी मनातून

अस्ताला चाललेला सूर्य

हातात तुझा हात

त्या स्पर्शातही जाणवते मला

मऊ उबदार पण ओली आर्तता

तीच ओढ तीच जवळीकता

तोच मलमली स्पर्श

मीही अन् मनही वाट पहात राहतं मग

बेभान वाऱ्याची अन् तुझ्या सलगीची...

                                        _दत्तात्रय उदारे.





रविवार, १३ जानेवारी, २०१९






















आठवतेय का तुला....


                                आठवतेय का तुला.... 

            मानवी संघर्ष हा माणसाला खऱ्या अर्थाने दमदार आणि चिवट बनवतो. जगण्याची उमेद नेहमीच माणसाला आपल्या उत्कर्षाची वाट दाखवत असते.सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होतात असंही नसतं पण म्हणून आयुष्य कधीच थांबत नाही;आणि ते थांबत नाही म्हणूनच मार्ग सापडत राहतात.जर ते थांबले तर आयुष्याचं डबकं झाल्याशिवाय राहात नाही. 

             प्रवाहाविरुध्ह पोहणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नसतं;पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणसं हा लढाही हसतहसत देतात आणि यशस्वीही होतात.जेव्हा आपली माणसं आपल्या विरोधात उभी राहतात तेव्हा तर जगण्याची खरी कसोटी असते.रक्ताच्या नात्याला जेव्हा वैर प्राप्त होतं ते वैर खूप टोकावरचं असतं. इथं फक्त जिद्दच तुमच्या मदतीला येते ती जिद्द असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता.

                   एकदा का तुम्ही यशस्वी झालात कि मग पुढचा प्रवास तुमच्यासाठी सुखकारक असतो.माणसं कशी वागू शकतात हे अनुभवलेला माणूस किती समृद्ध होत असेल याची कल्पनाहि न केलेली बरी.चांगले वाईट अनुभव घेत जगता आलं पाहिजे.मागे वळून पाहिल्यावर कळतंआपण काय कमावलं आणि काय गमावलं.पण कमावलेल्या गोष्टीपुढंं गमावलेल्या गोष्टी कस्पटासमान वाटायला लागतात.मग त्या वस्तू असोत नाहीतर व्यक्ती.

                फुरसतीच्या वेळी माणूस आपल्या आयुष्याची पानं उलगडून पाहतोच की,आणि रमतोही अगदी नकळतपणे. 









आठवतेय का तुला... 


आठवतेय का तुला 

आपली पहिली भेट

तिरक्या कटाक्षांची 

हळूवार नजरभेट.


बघता बघता सारे 

जुळत गेले बंध 

खुलवत होतीस तू 

आयुष्यातील रेशीमबंध. 

  

कल्पनेच्या पलीकडे 

सारे काही घडत गेले 

बिघडलेले क्षणसुद्धा 

कसबीने बसत गेले.

  

साऱ्यांच्या विरोधाचे 

वेचत कण न् कण 

तू फुलवत गेलीस 

आयुष्यातील क्षण न् क्षण. 

  

मोठ्या आत्मविश्वासाने 

दु:ख लपवत लपवत 

मार्ग काढलास तू 

अडचणी चुकवत चुकवत. 

  

क्षण सावरण्याचे आले 

आयुष्यात आपल्या मोजकेच 

पण अलगतपणे त्यांना

वेचलेस अगदी हलकेच.

  

 सुख दु:ख झेलत 

नेटाने बाबवार 

उसवत गेलेली शिवण 

विणत होतीस हळूवार.

  

साऱ्यांच्या नकळत 

पण अतीव काळजीने 

जीवन आपले सावरत 

परिसस्पर्शाच्या कल्पकतेने.

 

सावरलेस जीवनसुद्धा 

कडूगोड आठवणींसह 

जपलेस स्नेहबंधसुद्धा 

सर्वांच्या अपेक्षांसह.

 

 

                                                                                    _दत्तात्रय उदारे.