सोमवार, २५ मार्च, २०१९

 

 

 

 

 

माझं असणं ,माझं नसणं मला माझ्यापुरतं ठेवायला आवडतं.

सहजी माझ्या अंतरंगात मी कुणालाही प्रवेश देत नाही.

तो भाग मी कायमच अबाधित ठेवलेला असतो. 

प्रत्येकाचंच भावविश्व वेगवेगळं असतं,

दिसायला काहीही दिसो पण 

मनाची घालमेल प्रत्येकवेळी ओठावर आणता येत नसते.

या भावना ज्याच्या त्यानं समजून घ्यायच्या असतात. 

समजण्याची पातळी मात्र आपल्याला समजायला हवी

 नाहीतर अर्थाचा अनर्थ म्हणा 

की

रंगाचा बेरंग म्हणा 

पण व्हायला वेळ लागत नाही. 

जुळलेल्या तारा असतील तरच सुराला लय सापडते. 

सगळ्याच गोष्टी काही जगाला दाखवता येत नाहीत. 

जगापुढे केविलवाणं असणं म्हणजे आपलं हसू करून घेण्यासारखं असतं. 

आणि 

हे मात्र जो तो आपापल्या परीने टाळत असतो......

 

 

 

 

                                                                  _दत्तात्रय उदारे.

 

 



शनिवार, ९ मार्च, २०१९

" तृप्ती "

                   

 

                     तीच तू अन् तोच मी 

             पण 

            प्रत्येक भेटीत वेगळी 

            आणि 

            वेगळीच भासत आलीस 

            तू मला.

          जितकी तू मला माझी वाटत गेलीस तितकीच तू मला हवीहवीशी वाटत गेलीस. काही क्षण सरुच नयेत असं वाटतं नं त्यापैकीच हे क्षण असतात;पण ते मात्र पंख लावल्याप्रमाणे उडून जातात. तुझ्या सहवासात राहायची खूप इच्छा असते;राहतोही आपण.... पण मन भरत नाही.

                               भरेल ते मन कसलं,सदाच ते तुझ्या सहवासाला आतुरलेलं असतं.तुला ते माझ्या डोळ्यात दिसतही असेल पण तू ते बोलणार नाहीस आणि मी ते लपवणार नाही.आता काय आणि कसं लपवायचं तुझ्यापासून.तुझ्या अस्तित्वानं ओलं झालेलं मन तुला जसं वाचता येतं तसंच ते मला लपवताही येत नाही आणि मी लपवतही नाही.   

                        कायमच पुढच्या भेटीची वाट पाहण्यास मन अधीर असतं, पुरेपूर वेळ एकमेकांना देऊनही काहीतरी बाकी राहील्याची जी हुरहूर असते ना ती त्या मनांना माहित असते जे एकमेकांच्या सहवासासाठी धडपडत असतात. खरंच मानवी मनाला जी तृप्तीची ओढ असते ती तृप्ती लाभत असेल का कधी....कारण तृप्तीचं समाधान फार काळ टिकत नाही.....मन कायमच तुझ्याबाबतीत अतृप्तच राहतंय.....

    


                                    _दत्तात्रय उदारे.