तीच तू अन् तोच मी
पण
प्रत्येक भेटीत वेगळी
आणि
वेगळीच भासत आलीस
तू मला.
जितकी तू मला माझी वाटत गेलीस तितकीच तू मला हवीहवीशी वाटत गेलीस. काही क्षण सरुच नयेत असं वाटतं नं त्यापैकीच हे क्षण असतात;पण ते मात्र पंख लावल्याप्रमाणे उडून जातात. तुझ्या सहवासात राहायची खूप इच्छा असते;राहतोही आपण.... पण मन भरत नाही.
भरेल ते मन कसलं,सदाच ते तुझ्या सहवासाला आतुरलेलं असतं.तुला ते माझ्या डोळ्यात दिसतही असेल पण तू ते बोलणार नाहीस आणि मी ते लपवणार नाही.आता काय आणि कसं लपवायचं तुझ्यापासून.तुझ्या अस्तित्वानं ओलं झालेलं मन तुला जसं वाचता येतं तसंच ते मला लपवताही येत नाही आणि मी लपवतही नाही.
कायमच पुढच्या भेटीची वाट पाहण्यास मन अधीर
असतं, पुरेपूर वेळ एकमेकांना देऊनही काहीतरी बाकी राहील्याची जी
हुरहूर असते ना ती त्या मनांना माहित असते जे एकमेकांच्या सहवासासाठी धडपडत असतात.
खरंच मानवी मनाला जी तृप्तीची ओढ असते ती तृप्ती लाभत असेल का कधी....कारण
तृप्तीचं समाधान फार काळ टिकत नाही.....मन कायमच तुझ्याबाबतीत अतृप्तच
राहतंय.....
_दत्तात्रय उदारे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा