आठवतेय का तुला....
मानवी संघर्ष हा माणसाला खऱ्या अर्थाने दमदार आणि चिवट बनवतो. जगण्याची उमेद नेहमीच माणसाला आपल्या उत्कर्षाची वाट दाखवत असते.सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होतात असंही नसतं पण म्हणून आयुष्य कधीच थांबत नाही;आणि ते थांबत नाही म्हणूनच मार्ग सापडत राहतात.जर ते थांबले तर आयुष्याचं डबकं झाल्याशिवाय राहात नाही.
प्रवाहाविरुध्ह पोहणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नसतं;पण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माणसं हा लढाही हसतहसत देतात आणि यशस्वीही होतात.जेव्हा आपली माणसं आपल्या विरोधात उभी राहतात तेव्हा तर जगण्याची खरी कसोटी असते.रक्ताच्या नात्याला जेव्हा वैर प्राप्त होतं ते वैर खूप टोकावरचं असतं. इथं फक्त जिद्दच तुमच्या मदतीला येते ती जिद्द असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता.
एकदा का तुम्ही यशस्वी झालात कि मग पुढचा प्रवास तुमच्यासाठी सुखकारक असतो.माणसं कशी वागू शकतात हे अनुभवलेला माणूस किती समृद्ध होत असेल याची कल्पनाहि न केलेली बरी.चांगले वाईट अनुभव घेत जगता आलं पाहिजे.मागे वळून पाहिल्यावर कळतंआपण काय कमावलं आणि काय गमावलं.पण कमावलेल्या गोष्टीपुढंं गमावलेल्या गोष्टी कस्पटासमान वाटायला लागतात.मग त्या वस्तू असोत नाहीतर व्यक्ती.
फुरसतीच्या वेळी माणूस आपल्या आयुष्याची पानं उलगडून पाहतोच की,आणि रमतोही अगदी नकळतपणे.
आठवतेय
का तुला...
आठवतेय
का तुला
आपली
पहिली भेट
तिरक्या
कटाक्षांची
हळूवार नजरभेट.
बघता बघता सारे
जुळत
गेले बंध
खुलवत
होतीस तू
आयुष्यातील
रेशीमबंध.
कल्पनेच्या
पलीकडे
सारे
काही घडत गेले
बिघडलेले
क्षणसुद्धा
कसबीने बसत गेले.
साऱ्यांच्या
विरोधाचे
वेचत
कण न् कण
तू
फुलवत गेलीस
आयुष्यातील
क्षण न् क्षण.
मोठ्या
आत्मविश्वासाने
दु:ख
लपवत लपवत
मार्ग
काढलास तू
अडचणी
चुकवत चुकवत.
क्षण
सावरण्याचे आले
आयुष्यात
आपल्या मोजकेच
पण
अलगतपणे त्यांना
वेचलेस
अगदी हलकेच.
सुख दु:ख झेलत
नेटाने
बाबवार
उसवत
गेलेली शिवण
विणत होतीस हळूवार.
साऱ्यांच्या
नकळत
पण
अतीव काळजीने
जीवन
आपले सावरत
परिसस्पर्शाच्या कल्पकतेने.
सावरलेस
जीवनसुद्धा
कडूगोड
आठवणींसह
जपलेस
स्नेहबंधसुद्धा
सर्वांच्या
अपेक्षांसह.
_दत्तात्रय उदारे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा