मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

#निमित्त.

#worldpeaceDay...

 

        “जागतिक शांतता दिवस” हा संपूर्ण जगात #शांतता आणि #अहिंसा स्थापित करण्यासाठी दरवर्षी  २१ सप्टेंबरला साजरा केला जातो. ... २१ सप्टेंबर १९८२ हा प्रथम आंतरराष्ट्रीय #शांतीदिन ठरला.

         २००१ साली या ठरावात बदल करुन सप्टेंबरमधील तिसरा मंगळवार न धरता, २१ सप्टेंबर या दिवसावर #शांतीदिनम्हणून शिक्कामोर्तब झाले.

         जागतिक अशांतता पाहिली तर खरंच शांततेची गरज आहे.मानवी जीवनमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.मानवी भावना सर्वत्र राजरोसपणे भडकवल्या जाताहेत.हे नक्कीच मानवीहितासाठी योग्य नाही;पण मानवाला हे समजत नाही.सगळीकडे भडकपणा वाढत चाललेला आहे.वडिल किंवा वडीलधारी मंडळी यांच्याविषयी कसलाही आदर बाळगला जात नाही.एकमेकांविषयी बोलताना दर्जा रसातळाला चालल्याची जाणिव सतत होत असते.कुठंतरी हे एका मर्यादेत यायला हवे.

         शांतता किंवा अहिंसा ही बोलण्याची असावी वागण्याची असावी,कृतीची असावी, एकूणच काय तर ती आचरणातून दिसावी.शांतता ही तुम्हाला निसर्गाशी तादात्म्य पावण्याची शक्ती प्रदान करते.

          कोरोना काळातील अखिल विश्वाने ती अनुभवली.जगाचे सगळे ठप्प झाले. जग स्तब्ध झालं.निरव शांतता सर्वदूर पसरली. त्यात एक भीषणता होती,भयानकता होती तरीही ती मनालाच काय पण निसर्गालासुद्धा उल्हासित करणारी होती.उभ्या जगाला बुद्धाने शांतीचा संदेश दिला त्यामागचे गमक मानवासमोर आले;पण मानव प्राणी हाही शेवटी एक प्राणीच आहे.भौतिक सुखांच्या पाठीमागे पळून होणारी दमछाक मिटवण्यासाठीही तो पुन्हा भौतिक साधनांचीच मदत घेत असतो.आता पुन्हा जग शांत होईल न होईल पण बारकाईने आठवण्याचा प्रयत्न करुन पहा. कोरोना काळातील दिवसा पहाटे संध्याकाळी हवेचा आवाज पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायचा.निसर्गातून चिमण्या नष्ट होत चालल्या आहेत;पण त्या जेवढ्याकाही असतील तेवढ्यांच्याही अस्तित्वाची नोंद त्या आपल्याला त्यांच्या चिवचिवटातून करुन देत होत्याच.निसर्गाचं नादमाधुर्य त्या काळात पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. साधारण १९८५ च्या काळातही ते बऱ्यापैकी आमच्या पिढीने अनुभवलं आहे.कारण त्या काळी बऱ्यापैकी कमी भौतिक साधनं अस्तित्वात होती.गाड्यांचे आवाज नव्हते टीव्ही मिक्सर यांचेही आवाज नसायचे. रेदिओ मात्र असायचे पण गाण्यातून मधुरताचा अनुभवायला मिळत होती. कारण कानाला बधिरता प्राप्त करुन देणारं संगीत त्याकाळात नव्हतं.

         सृष्टीला शांततेची गरज आहेच हेच आपल्याला दिसेल. एका दिवसापुरता शांततादिन काहीही उपयोगाचा नाही.तो किमान सप्ताह किंवा पंधरवाडा असायला हवा. या काळात सर्व वाहने बंद करुन फक्त शांतता अनुभवायला हवी. कारण शांततेलाही आपला स्वतःचा एक आवाज असतो;तो सगळ्यांनाच ऐकू येत नाही हे मात्र वाईट आहे.

          ज्या दिवशी शांतता आणि अहिंसा मानवी जगण्याचं जीवनाधार बनेल.

                           “विश्वशांती करके दिखलाये

                           तब होवे प्रण:पूर्ण हमारा,

                            झंडा ऊँचा रहे हमारा...”

त्यादिवशी खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा केल्याचं समाधान उभ्या विश्वाला झालेलं असेल...

                           

 

 

 #जीवनयात्री.                                               

 #©दत्तात्रय_उदारे.

Dattatraya Udare DM

 

                            {फोटो:अर्थातच गुगलवरुन साभार.}



शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

#चिक्कीवाला

 

 

बालपणीचा काळ सुखाचा;

असं आज म्हणावसं वाटतं.

कारण खंत कशाची असते

तर आपल्याकडे जे नाही त्याची.

अप्रूप कशाचं असतं

तर जे खूप प्रतिक्षेनंतर

आपल्याला मिळालंय त्याचं.

दुःख कशाचं असतं

तर आपल्याकडं असलेलं

गमावलं त्याचं.

ऐन पंचेचाळिशीत बघा बरं डोकावून.

तुम्हाला दुःख आणि खंत वाढलेल्या दिसतील;

अगदी खात्रीने सांगतो.

बालपण गमावलेलं आहे;

म्हणून त्याचं दुःख आहे.

आणि

वरकडी अशी की;

त्याचीच खंतही आहे.

कारण

आज ते आपल्याकडं नाही.

 

मग

आपल्या हाती काय आहे…?

तर फक्त आठवणी.

अर्थात त्या काळात त्या रम्य नव्हत्या;

म्हणूनच कधी एकदा मोठ्ठा होतो

याची घाई झालेली होती.

आठवून पहा

त्याकाळात मोठ्ठं” होण्याची फार घाई होती.

मोठं झाल्यावर

समजत गेलं की;

बाबा हे वाटतं तेव्हढं सोपं प्रकरण नाही.

 

"मुठीतली रेती

आणि

मिठीतली xxx

सुटत चालली की माणूस हळवा होतो."

 

हक्कानं प्रत्येकाला रमायला

आवडणारी जागा म्हणजे बालपण.

खूप जुना काळ आहे.

तेव्हा मी खूप लहान होतो...

त्यावेळी सायकलवर

एक “चिक्की विकायला माणूस यायचा;

पोषाखावरुन आगळावेगळा भासायचा

रेगाळ्या कापडाचा पायजमा

आणि

त्याच कपड्याचा शर्ट

डोक्यावर गोंड्याची टोपी;

सोबतीला बांबू बांधलेली सायकल

आणि

त्या बांबूला असणारी रंगीत चिक्की.

अंगात असलेली कला

तो चिक्कीतून चितारायचा.

कामठीवर चिक्की चिकटवून

सुंदर प्राणी पक्षी बघताबघता

त्या कामठीवर तयार व्हायचे.

मुलं फर्माईश करायचे माकड...

की डोक्याला गिरकी घेत

गोंडा फिरवत फिरवत

चिक्की आकार घ्यायला लागायची.

क्षणात कामठीला हाताने धरलेलं

माकड दिसायला लागायचं...

तोवर दुसरा मुलगा चिमणी म्हणायचा;

केलेली फर्माईश

आणि

उत्कंठा वाढवणारे क्षण

चिमणीला मूर्त रुप देऊन जायचे...

मोर,गाय,बैल यापुढची फर्माईशच नसायची.

फारसे पैसे घरुन कुणाला मिळतच नसायचे.

आणि रडून पडून हट्ट तेव्हा करता येत नसायचा

कारण असा हट्ट म्हणजे महायुद्धाची

तात्कालिक कारणं असायची.

त्यामुळे तेंव्हाचे हट्टही समजदार असायचे.

बरीचशी गर्दी बघ्यांची असायची.

कलाकृती बघण्याचा आनंद

मात्र “मोफत” असायचा.

त्यामुळे चिक्कीवाल्याच्या मागे

या गल्लीतून त्या गल्लीत मुलं जायची.

कधीतरी;

आई-वडिलांना वाटले

तर पैसे मिळायचे

अशावेळी “अप्रूप” आडवे यायचे.

तयार केलेले आवडीचे

प्राणी पक्षी तासन्तास चोखले जायचे.

अशावेळी घरातील

कोणीतरी ओरडायचे

मग गडबडीने तो प्राणी पक्षी

एकदम “गट्टम” केला जायचा.

आता काळ बदलला

आणि

बदलत्या काळाबरोबर

रेगाळया कपड्यांचा तो चिक्कीवालाही

हळूहळू विरघळत गेला.

तो कधी नाहीसा झाला कीं;

अंतर्धान पावला कुणाला आठवतच नाही.

तो आजही भेटतो फक्त आठवणीतच.

काळाला कधी नकळत पंख फुटले

कळलंच नाही.

पण पंखावरचे रंग मात्र मागे ठेऊन

फुलपाखरासारखे हे आगळेवेगळे

बालपणीचे सोबती

कधी अनंतात विलीन झाले;

कुणास ठाऊक.

 

                     @जीवनयात्री

                     _©दत्तात्रय उदारे.



                                            {छायाचित्रे गूगलवरुन साभार.} 






 

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

@पावसाळा #वडापाव



@पावसाळा
#वडापाव 

 

पावसाचं नातं मानवी मनाशी जुळलेलं आहे.

पाऊस तसाही मला भावतो;

तो तनालाच नाही

तर मनालाही भिजवतो.

भिजलेल्या तनमनाला

मोहरुन टाकण्याची

अफाट ताकद आहे पावसात;

पण तो चिंबपणा पेलवता यायला हवा...

नाहीतर मग पुन्हा

ये रे माझ्या मागल्या...

प्रत्येकवेळी पावसात

वेगळा पाऊस शोधण्याची

शोधक प्रवृत्ती तुमच्यात हवी

नाहीतर पाऊस म्हटलं की;

वेंगाडणारी तोंडंच तुम्हाला दिसतील;

चिडचिड होते इथपासून

गारव्यापर्यंत कारणं ऐकायलाही मिळतील.

पाऊस कधी कधी

खूप गडबडीने येतो

पटकन कोसळून घेतो,

आला आला म्हणेस्तोवर

पळून गेलेला असतो;

उगीच गनिमी काव्याचा

फील देऊन जातो.

तर कधी कधी

तो खूप वातावरण निर्मिती

करत बसतो

वारा सुटतो

धुरळा उडवतो

वाऱ्याला आवाज देतो,

मस्त आभाळ जमवायला सुरुवात करतो,

ढगांची दाटी झालेली असते;

मग कधीतरी दोन तीन तासांनी

पावसाला सुरुवात

तोही मन लावून पडेल याची शाश्वती नाही.

कोसळला तर मनसोक्त नाहीतर

लाजऱ्या नवरीसारखा

सडा शिंपून जाणार...

आम्ही लहान असतानाही पाऊस यायचा

सकाळची सुरुवातच असायची

दाटून आलेलं कुंद वातावरण

हवेत मस्त टोचणारा गारवा

मनात भिजयची हौस;

पण आईवडिलांची सक्त ऑर्डर

पावसात भिजायचं नाही;

बघताबघता पावसाला सुरुवात.

हा पाऊस मात्र

मस्त रमलेला असायचा

चार पाच दिवस

मुक्कामालाच असायचा मग तो.

त्याकाळी त्याला

"झड लागली"

म्हणायचे.

आता तेवढं भरुन येणारं

ना आभाळ राहिलं ना ढग राहिले

नाही ना सहन करणारी माणसं राहिली.

पाऊस दोन तीन दिवस रोज तासभर

पडून गेला तरी माणसं

कदरून जातात;

सहज बोलतात

पाऊस तर काहीच सुधरु देईना.

माणसं नाजूक झाली की

रडी

अनाकलनीय.

कधी कधी तो वाजत गाजत येतो

साग्रसंगीत

ढगांचा गडगडाट

विजांचा कडकडाट

सोसाट्याच्या

वाऱ्याच्या गर्जनेसह

टपोऱ्या थेंबाने अक्षरशः

सगळयांना झोडपू पाहतो,

उगीच रागावलेला फील देऊन जातो.

इतका वेग असतो कोसळण्याचा की

जिकडेतिकडे पाणीच पाणी.

रस्ता भरुन

पाण्याचे लोट वाहायला लागतात;

नद्या नाले भरुन जातात

बघता बघता पूर स्थिती निर्माण होते.

आपण माणूस

पावसापुढे किती कस्पटासम आहे

याची प्रचिती येते.

अशी कितीतरी रुपं आहेत पावसाची;

हसरी

नाचरी

भिजरी

आठवणींची रेलचेल असणारी

चिंब चिंब

झालेली तने मने

तुम्हाला भेटतील की नाही कसं सांगावं

पण शोधायचा प्रयत्न तर करुन पहा...

आणि नाहीच जमलं

तर सर्वांना भावणारा प्रकार म्हणजे

पाऊस पडत असताना

गरमागरम वडापाव;भजी

सोबतीला वाफाळणारी कॉफ़ी

कधीतरी बेत जमवा.

सोबतीला

बॅकग्राउंडला

केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

नाहीतर

भेट तुझी माझी स्मरते

अजुन त्या दिसाची

धुंद वादळाची होती

रात्र पावसाची...”

नाहीतर

नभं उतरू आलं,

चिंब थरथर वलं

अंग झिम्माड झालं

हिरव्या बहरात...

आणि हो

पावसाळ्यात वडा-पाव नाही खाल्ला

तर पाप लागतं म्हणे... 😜

 

                      @जीवनयात्री

                    _ दत्तात्रय उदारे.