फुलपाखरू
इमारतीच्या पुढे बघा ही
सुंदर सुंदर बाग असे
नाजूक साजूक फुलपाखरु
गिरक्या घालीत येई कसे.
वाऱ्यावरती हिरवे हिरवे
गवत कोवळे छान डुले
निळा जांभळा तांबूस पिवळा
रंग लेवूनी येत फुले
त्या रंगांचा झगा घालूनी
भिरभिरते हे फुलपाखरू
चित्र तयाचे काढू सुंदर
पंखामधुनी रंग भरू
या कवितेला "या वाऱ्याच्या बसूनी विमानी सहल करू या गगनाची "चाल चपखल बसते.मूळ गेयता हा गुण असल्यामुळे गुणगुणावीशी वाटणारी ही कविता मुलांसोबत मोठ्यांनाही सुखावून गेल्याशिवाय राहत नाही.नकळत डोळ्यापुढे आठवणीतील "फुलपाखरू" उभे केल्याशिवाय कविता पुढे सरकत नाही.गाता गाता केंव्हा आपल्या मनाला रुपेरी पंख लागतात तेही समजत नाही,आणि बघताबघता आपणही आपल्या रम्य बालपणातील सोनेरी विश्वात परत जातो.
फुलपाखरांच्या मागे धावण्याचं एक वय असतं.हे जरी खरं असलं तरी ते दिवस पुन्हा यावेत असं प्रत्येकाला वाटत असतं.मन त्या सोनेरी विश्वात धावण्यास बागडण्यास तयार असतं.क्षणभरासाठी का होईना पण आपण आपलं बालपण जगून घेतो.त्यावेळचे वर्गमित्र वर्गमैत्रिणी आठवतात.मन त्यांच्यासोबत जगलेले क्षण पुन्हा जगायला आतुर होतं.नकळत डोळे मिटले जातात.डोळ्यांसमोरून तेंव्हाचा तो रुपेरी पट सरकायला सुरुवात होते.केलेल्या गमतीजमती आठवायला लागतात.फुलपाखरांना पकडायची अहमहमिका,त्यांच्यापाठी केलेली धावपळ कधी पकडलेली तर कधी हातातून सुटलेली फुलपाखरे आठवत राहतात.पकडलेली फुलपाखरे घरी किंवा शाळेत नेल्यावर आईवडिलांनी किंवा गुरुजींनी केलेली शिक्षा दिलेला उपदेश बसलेला मार.सग्गळंसग्गळं आठवतं.पुन्हा फुलपाखरं धरायची नाहीत असं ठरवून पुन्हा केलेल्या चुका पुन्हा बसलेला मार आठवतो.कसंही असलं तरी ते बालपण नक्कीच चांगलं होतं.त्या वयात मोठ्ठ होण्याची ओढ होती आणि आज लहान होण्याची आस आहे.मोठ्ठ होता आलं पण लहान होता येत नाही ही खंत मनाला असह्य वेदना देऊन गेल्याशिवाय राहत नाही.
कवितेच्या माध्यमातून काहीच नाही पण गतकाळात डोकावता आल्याचं समाधान मिळतं.हेही नसे थोडके.प्रत्येकाला स्वत:चा एक रम्य काळ असतो.कारण एवढंच वय असं असतं ज्यात गरिबी-श्रीमंती जाती-पाती यांच्याशी कसलंही देणंघेणं नसतं.आणि असेलच तर फक्त सवंगड्यांबरोबर खेळणं बागडणं इतकंच.आजचं सोडून द्या.आज पालक मुलांना आपल्या बरोबरीच्या (स्टेट्स) मुलांतच खेळू देतात.असंख्य बंधनात बांधलेलं आजच्या मुलांचं बालपण बघितलं की वाईट वाटतं.किती बंधनात आपण त्यांना जखडून ठेवलंय असं वाटतं.
काळ बदलत गेला माणसं बदलत गेली.पण फुलपाखरं ..................पण फुलपाखरं मात्र तशीच बालमनाला भुरळ घालत राहिली.उलट मीतर म्हणेन की फुलपाखरांची दुनिया अजून रंगीबेरंगी होत गेली.बोटांवर राहिलेला तो मखमली रंग मनाला आजही चढल्याशिवाय राहत नाही.आणि आजचं विचारी मन फुलपाखरांना बोट लावू देत नाही.लावलंच कदाचित बोट ........तर आपल्या बोटांचाच रंग तर फुलपाखरांना लागणार नाही ना ? असं वाटल्यावाचून राहत नाही.
_ दत्तात्रय उदारे जामखेड
( स्वगत )

