शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

"""शिक्षक दिन"""



                      



शिक्षक / गुरु

 

खऱ्या अर्थाने आयुष्य घडविणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.

आपल्या बालमनावर खऱ्या अर्थाने छाप उमटवून जाणारी व्यक्ती असते ती म्हणजे शिक्षक.आपल्या नकळतपणे आपण त्याचं अनुकरण करत असतो.त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपण घडत असतो. प्रसंग माणसाला शिकवत जातात,पावलापावलावर माणूस शिकत असतो.शिकवणे ही प्रक्रिया न राहता ते सहज होऊन जातं.काही गोष्टी मात्र सहज नसतात प्रयत्नपूर्वक बदल करावे लागतात;स्विकारावे लागतात.टप्पेटोणपे खात खात आपण घडत जातो बदलत जातो शिकत जातो....

या घडवणाऱ्या शिकवत जाणाऱ्या क्षणांना कधी विसरायचं नसतं...

 

 

आयुष्याला खऱ्या अर्थाने आकार देणाऱ्या

ज्ञात अज्ञात अशा सर्व गुरूंना

ज्यांनी आपल्याला घडवलं

कधी बिघडवलं सर्वांना

शिक्षकदिनाच्या निमित्ताने आपण

आठवतो आणि ऋण व्यक्त करतो.

 

 

                              _दत्तात्रय उदारे.

                                    

रविवार, १९ जुलै, २०२०

समय तू धीरे धीरे चल…



पोकळी 

                      मानवी आयुष्यात बरेचदा या ना त्या कारणाने "पोकळी" निर्माण होत असते. आपल्या आयुष्यात वेगवेगळी माणसं येत असतात त्यापैकी काही माणसं आपलं एक वेगळं स्थान आपल्या मनात निर्माण करतात. काळाच्या ओघात ही माणसं आपल्यापासून लांब निघून जातात पण प्रसंगाने आपल्याला त्यांची आठवण मात्र येत असते.कधी कधी काही नात्यांमध्ये कटूता निर्माण होते आणि आपल्या मनामध्ये राग भरून राहतो;ही मनाची कटूता आपल्या मनाला नेहमी सतावत असते. आपण लांब जाण्याचा विचार करतो पण राहूनराहून ती व्यक्ती वा तिच्या आठवणी आपल्या मनावर तरंग उठवत जात असतात. मनामध्ये एक पोकळीची भावना निर्माण होते. आपण नवीन मित्र जमवतो नवीन नाती गुंफण्याचा प्रयत्न करतो पण व्यर्थ त्याव्यक्तीची पोकळी दुसरा कोणी भरून काढू शकत नाही.

                       भावनिक गुंतागुंत ही नेहमी आपल्या जवळच्या माणसामध्ये होत असते. मग ते नातं किती नवं किती जुनं यावर त्याची तीव्रता अवलंबून नसते तर ते नातं किती परिपक्व आहे यावर अवलंबून असते. परिपक्वता ही नेहमी समग्र विचाराने येत असते. नात्यांमध्ये दरी निर्माण झाली तर ती दूर करण्याचा प्रयत्न व्हायला हवा;पण समाजात कोणीही कमीपणा घ्यायला तयार नसतो.पर्यायाने त्या नात्याचा अंत झाल्याशिवाय राहत नाही.हे नातं संपलं असं आपण मानतो पण मनात मात्र सतत द्वंद्व चालू असतं.त्यात आपली होरपळ होत असते आणि समोरचा मात्र बेफिकीर असतो असं का व्हावं हे शोधण्यात आपलं तरल मन गुंतत जातं आणि माणूस अबोल होत जातो. हा अबोलपणा वाढीला लागत जातो. अस्वस्थपणा त्रासदायक होत जातो;ज्याला कोणाला हे होतं तो माणूस नक्कीच सहृदय असतो; पण व्यवहारी जगात मात्र त्याला किंमत नसते.जग त्याला मूर्ख ठरवून मोकळं होतं आणि तो माणूस या अवस्थेत गुंतून जातो. 

                       कुणाच्या आयुष्यात जवळची व्यक्ती प्रवास अर्ध्यात टाकून मधूनच एक्झिट घेते अशावेळी त्याला सावरणं किती कठीण होऊन जात असावं याची तर कल्पनाही न केलेली बरी.ही पोकळी तर कदापि भरून निघू शकत नाही.सगळ्या गोष्टींवर काळ हेच एकमेव उत्तर असतं.सरणाऱ्या काळाबरोबर जखमा भरत जातात पण तरीही खूण व्रण मात्र मागे ठेवून जातात.

                      अशा असंख्य पोकळ्या आपल्या मनात गाडलेल्या असतात.कधी कोणती पोकळी समोर येईल याचा भरवसा नसतो.कारण पोकळी ही कधीच भरून निघत नाही.ती अंतापर्यंत तशीच ''पोकळ'' राहते. 

               

 

                                                                                          _दत्तात्रय उदारे.