बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

कोपरे

 कोपरे

कोपरे कसेही असोत

ते ओरखडे उठवणारेच असतात हे नक्की.

कितीही जपा

तुम्ही त्यांचा टप्प्यात आलात 

की ते आपल्या अस्तित्वाची 

प्रखरपणे जाणिव करुन 

दिल्याशिवाय राहत नाहीत.

 

वर्षानुवर्षे त्यांना 

धारदार असरदार राहण्याचं 

वरदान तर उपजतच लाभलेलं असतं..

 

आणि 

दिसायला कितीही आकर्षक 

दिसत असले तरी त्यांच्या प्रेमात 

न पडलेलंच हितावह असतं.

 

अशा दुखऱ्या कोपऱ्यांना 

मोल्ड करायला  

शिकायला हवं... 

पण प्रश्न असा आहे की 

शिकायचं तरी काय काय 

आणि किती..

 

पण 

आयुष्यभर जखमांचे व्रण घेऊन 

जगण्यापेक्षा हे कोपरे 

गुळगुळीत केलेलेच बरे...

 

#कोपऱ्या

#कोपऱ्यावरचे

#कोपरे

#शल्यांचे पर्वत उभे करणारे...

 


©दत्तात्रय उदारे.




नातं...

जगताना

जगणं नाही हरवलं पाहिजे;

नाहीतर

फक्त दिवस सरत जातात 

जगणं होतंच नाही.

भावनांच्या वादळात 

माणसं दुखावण्याचा

संभव असतो. 

तो टाळता येईलच 

असे नसते. 

पण 

असे क्षण 

जितके टाळता येतील 

तितके कटाक्षाने 

टाळायचा प्रयत्न असायला हवा. 

कारण 

कुठलंच नातं 

कधीच परिपूर्ण असत नाही.

न जमणाऱ्या गोष्टी 

सोडूनही देता आल्या पाहिजेत 

तरच 

जमणाऱ्या गोष्टींना महत्व येत जातं 

आणि 

नातं अधिक घट्ट होत जातं.

 

 

#बस_इतनाही!!

#जीवनयात्री

 

©दत्तात्रय उदारे.

 




मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

पेर्ते व्हा...


 आयुष्य जगायला आजही आपण अपुरे पडतोच...फरक एवढाच आहे की काहींना ते कळतं तर काहींना नाही.

उगवलेला दिवस असाही मावळणार आहे आणि तसाही मावळणारच आहे;मग तो आनंदात मावळलेला काय वाईट. 24x7 आयुष्यात कोळसा घेऊन बसलं तर कसं चालेल,कधी तरी कपडा घेऊन बसायला हवं सगळंच कधीतरी साफ करायलाच हवं...

सफाई सफाईदारपणे पार पडायला हवी,नाहीतर ती तशीच राहिली तरी चालते.

जीवनाच्या वाटा कधीतरी चाकोरीबाहेर जाऊनही जगायला हव्यात. सतत रडणारी मुलं घरात नकोशी होतात तसंच माणसाचंही आहे. 

मानो तो मौज हैवरनासमस्या तो रोज है...!!! 

जीवनाच्या मुळाशी समस्यांची पोतडी दडलेली असतेच; ती तशीच दडवून ठेवावी लागते आणि चेहऱ्यावर इस्त्री फिरवल्यासारखी सुरकुतीही नाहीशी करावी लागते.

 

जीवनात आनंद पेरावा लागतो तो आपोआप निर्माण होत नसतो. त्यासाठी माणूस म्हणून मातीशी नाळ जोडून ठेवावी लागते. प्रसंगांना साजेशी परिस्थिती निर्माण करावी लागते. आनंद वाटायला कष्ट लागतात दुःखाचं तसं नाही ते आपोआप पसरत जातं. जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कष्ट लागतात दुःख तर जन्मजात आपल्या सोबतच आलेलं असतं. त्या दुःखाच्या जाणिवेपायी जन्मलेला जीवही जन्मसोबत रडू घेऊन येतो आणि आपणही सगळीकडे आनंद न पेरता दुःख पेरीत बसतो.

 

#पेर्ते व्हा

#तू चाल पुढं...

©दत्तात्रय उदारे.

Dattatraya Udare DM

 


सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

#सुख

 


#
सुख

 

रात्री घट्ट झोपून 

सकाळी गाढ निद्रेतून 

उठायचं 

आणि 

मस्त बेड टी घेत 

अंथरुणात लोळत पडायचं 

तेही अंगावर 

मऊ रजई घेऊन 

यासारखं सुख नाही हो

 #हिवाळ्यात. 


या स्वर्गीय सुखाचा 

अतिरेक झाला तर 

तुम्हाला 

हलकीशी ग्लानी 

येण्याचा संभव असतो,

आणि 

 

ती.. 

आलीच 

 

तर साखरसाय...

 

म्हणजे सोने पे सुहागा हो....

 

#सहज

#सुखातिरेक

 

©दत्तात्रय उदारे.

 Dattatraya Udare DM

 





भाकरीचा चंद्र


 #भाकरीचा चंद्र शोधण्यात

 

#दोन_दिवस

      

 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले,

दोन दुःखात गेले

हिशोब करतो आहे आता 

किती राहिलेत डोईवर उन्हाळे

 

शेकडो वेळा चंद्र आला,

तारे फुलले

रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच 

जिंदगी बर्बाद झाली

 

हे हात माझे सर्वस्व,

दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले,

कधी कलम झालेले पाहिले

 

हरघडी अश्रू वाळविले नाहीत;

पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन 

सहाय्यास धावून आले

 

#दुनियेचा_विचार_हरघडी_केला

#अगा_जगमय_झालो

#दुःख_पेलावे_कसे,

#पुन्हा_जगावे_कसे,

#याच_शाळेत_शिकलो...

 

झोतभट्टीत शेकावे पोलाद

तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले

दोन दुःखात गेले...

 

कवी : नारायण सुर्वे

 

जन्मतःच पोटाला भूक दिली त्या पोटाची खळगी भरण्यासाठी उभी हयात माणसाला धडपड करावी लागते तरीही #मनासारखी भाकरी (सुखाची)

कधी लाभत नाही आणि टीचभर पोटाची खळगी कधीही भरत नाही. पोट भरल्याचं सुख फार क्षणभर टिकतं पण रित्या पोटाचं दुःख आयुष्यभरासाठी पुरतं

म्हणूनच तर 

सुख  पाहता जवापाडे ।

दुःख पर्वता एवढे ॥

असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते उगीच नाही.

अन्नासाठी दाही दिशा । 

आम्हा फिरविसी जगदीशा ॥ 

कृपाळुवा परमपुरुषा । 

करुणा कैसी तुज न ये ॥

ही वचनं वाचण्यासाठी नाहीतच मुळी.

जन्माचं सार लपलेलं आहे. 

हे समजायलाही काहींची हयात जाते 

पण  #समज काही येत नाही.

पोट भरल्यावर 

बुडाला हात पुसायला अक्कल थोडीच लागते.

ती लागते 

ज्या ताटात खाऊन आपलं पोट भरलं 

त्या ताटात हात धुतल्यावर 

त्याच ताटाला #हात जोडायला

इतका मानभावीपणा 

आपल्याकडे असावा लागतो.

पण #दुर्दैवाने नसतो.

जन्माबरोबर सुरु झालेला 

भुकेचा प्रवास मरणाच्या चितेवरच 

जाऊन संपतो...

 

#भाकरी

#पोट

#चंद्र

 

 #©दत्तात्रय_उदारे.

Dattatraya Udare DM