सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

 

#आत्महत्या

 

डॉ.शीतल आमटे

यांच्या घटनेतून पुन्हा एकदा चर्चेत आलेला विषय

#आत्महत्या.

मानवी जीवन तसं पाहिलं तर

नेहमीच अतर्क्य राहिलेलं आहे.

माणूस आत्महत्या का करतो...?

 हे न सुटणारं कोडं आहे.

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला

एक ना एक दिवस मरायचं आहे हे नक्की;

कारण मृत्यूइतकं शाश्वत काहीच नाही

मग ही घाई का...¿

काही दिवसांपूर्वीच

सुशांतसिंह राजपूतची घटना घडली.

तर्कवितर्क लावले गेले,

चर्चा होत राहिल्या,

नशेबाज सदराखाली

बरंच काही लिहिलं गेलं बोललं गेलं...

आता तर डॉक्टर असलेल्या;

सेवेची आणि संयमाची

पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून

घडलेली ही घटना

नक्कीच दुर्दैवी म्हणावी लागेल.

अनपेक्षीत काली झालेला मृत्यू

वा केलेला आत्मघात

हा नक्कीच दुर्दैवी आहे

यात शंकाच नाही.

आत्महत्येला काहीच पर्याय

का असू शकत नाही

हे न समजणारं एक कोडं आहे...?

त्याही आधी

अध्यात्मिक गुरु

भय्यूजी महाराज

यांची आत्महत्या

 खूप विचार करायला लावणारी होती.

मानवी जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर

संयमी आणि निस्वार्थ

असं उच्च कोटीतील आयुष्य

माणूस जगतोही;

पण उद्वेग ही एक अशी गोष्ट आहे की;

ती या सगळ्यावर पाणी फेरते.

हे जे उद्वेगाचे क्षण असतात

ते फार हुकुमी असतात

आणि या गर्तेतून माणूस

सहसा बाहेर येत नाही.

तो अधिकाधिक यात गुरफटत जातो

आणि

जगण्यापेक्षा मृत्यू जवळचा वाटायला लागतो.

अशा निर्णयाच्या

किंवा टोकाच्या क्षणी

ते दृढ होत जातात.

असे क्षण त्या-त्या माणसाला

कित्येकदा आत्महत्येची रिहर्सल घडवून आणतात.

ही पुनरावृत्ती माणसाची सवय होऊन जाते

आणि

त्या विषयाची धार

बोथट करण्यात मोठी भूमिका हे क्षण निभावत असतात.

अशा काळातच एखादी अप्रिय

अथवा

नकोशी वाटणारी घटना

त्या-त्या माणसांच्या आयुष्यात

सहजच घडून जाते

आणि

चटका अथवा झटका

अशा पोळलेल्या माणसाच्या

जिव्हारी लागते

आणि

मग अगदी क्षणात

निर्णय घेतल्यासारखी

माणसं असा टोकावरचा निर्णय घेऊन मोकळी होतात.

जगाला वाटत राहतं की;

इतकं सगळं हाताशी असताना

आणि

अगदी सुदृढ कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही

असं काय झालं असेल की;

अमुकतमूक व्यक्तीने आत्महत्या करावी.

मानापमान

हा खूप  मोठा परिणामकारक घटक आहे.

पुराणकाळातही अशा आत्मघाताच्या

घटना घडल्याची उदाहरणे आपल्याला सापडतात.

राजा दक्ष; दक्ष कन्या सती आणि शंकर भगवान

अशी ही कथा आहे.

एका यज्ञप्रसंगी

आपल्याला निमंत्रण नसल्याचा

जाब विचारायला गेलेली दक्ष कन्या

आणि शिवशंकर अर्धांगिनी सती

झालेला अपमान पचवू शकत नाही

आणि

त्याच यज्ञात स्वतःची आहुती देते.

हीसुद्धा एक आत्महत्याच आहे.

अशी खूप सारी उदाहरणं

सापडतील आपल्याला.

अर्जुन अभिमन्यूच्या हत्येनंतर

जयद्रथ वधाची प्रतिज्ञा करतो

पण सूर्यास्त होताना पाहून अग्निकाष्ठास

तयार होतो कृष्णलीलेमुळे तो वाचतो

पण हासुद्धा आत्मघाताचाच

एक प्रसंग होता.

इच्छामरण असतानाही

भीष्म पितामह आपला देह ठेवतात.

हे दुसरं काय होतं.

इतिहासातही अशा घटना आहेत ना...

आठवतंय का पहा

“वेडात मराठे वीर दौडले सात”

हीसुद्धा सामुहिक आत्महत्याच होती.

हे सात वीर बऱ्याच जणांना माहितच नाहीत...

प्रतापराव गुजर,

विसाजी बल्लाळ,

दिपोजी राउतराव,

विठ्ठल पिलाजी अत्रे,

कृष्णाजी भास्कर,

सिद्दी हिलाल

आणि

विठोजी

हेच ते सात वीर.

स्वराज्यातील रयतेला छळणारा

बहलोलखान

एकेक्षणी शरण येतो

आणि

प्रतापराव त्याला सोडून देतात.

त्यावरून शिवाजीमहाराज त्यांना सुनावतात

ही मनाला लागलेली गोष्ट घेऊन

प्रतापराव बहलोलखानाच्या मागावर निघतात

सोबतीला हे वीरही असतात.

तब्बल वीस हजाराच्या सैन्यात घुसून

हे हलकल्लोळ माजवतात

आणि

या लढाईत कमी येतात.

आपल्या सैन्याची वाट न पाहता

केलेली ही कृतीसुद्धा आत्मघातच नव्हती काय...? असो.

( हे सगळ्यांना पटणार नाही आणि ते पटावं असा अट्टाहासही नाही.त्यामुळे यावरुन चर्चा नको.न पटल्यास दुर्लक्ष करावे.)

 

 

आत्महत्येचा विषय मनात आलाच नाही

असा मनुष्यजीव भूतलावर सापडणेही कठीण आहे.

वेगवेगळ्या प्रसंगात माणसाला

"यापेक्षा मेलेलं बरं-अर्थात #आत्महत्या"

केलेली बरी असं वाटल्यावाचून राहत नाही.

थोडंसं अंतर्मनात डोकावून पाहावं;

पण प्रामाणिकपणे.

मानवी मनात वेगवेगळे विचार येतच असतात

पण म्हणून सगळेच आत्महत्याही करत नाहीत.

कदाचित ते तितका प्रेशर

त्यावेळी सहन करूनही त्यातून निघतात.

 

#आऊटलेट

असा एक शब्दप्रयोग

अशा घटना झाल्या की;

सहज सगळ्यांच्या ओठावर येतो.

तो जितका सहज उच्चारला जातो

तितका सहज विचार करुन बघा;

आपल्याला तरी शक्य होतं का व्यक्त होणं....

तर नाही असंच उत्तर येईल.

तसा थोडा बारीक विचार केला

तर आपण काही असामान्य व्यक्ती नाही आहोत;

बाकीच्या नावांचा विचार करता.

आता परत स्वतःवर या

आणि विचारा

तुम्ही खरंच #सामान्य आहात का...?

तर इथंही उत्तर नाहीच असं असणार आहे;

कारण प्रत्येकाच्या लेखी

तो स्वतः कधीही सामान्य नसतो

कारण प्रत्येकाला “स्व” असतो

आणि

तो त्या-त्या पातळीवर सक्रीय असतो

त्याला तुम्ही वेगळा करू शकत नाहीत.

प्रसंगानुरूप अशी घटना घडल्यावर

त्या-त्या घरातील अथवा कुटुंबातील माणसं असं म्हणतात कीं,

संबंधीत व्यक्तीने हे बोलून दाखवायला हवं होतं

अगदी जे काही पटत नव्हतं त्यासाठी

ती व्यक्ती भांडली असती तरी चाललं असतं ....

खरंच चाललं असतं का....?

तर “ना ही च.”

कारण हे शोभलं नसतं ना....

अशी वर्तुळं भेदनं

जेव्हा शक्य होत नाही ना

तेव्हा माणूस फार एकाकी पडतो.

भरलेल्या घरातही त्याला एकटेपणा जाणवायला लागतो

कारण मनाची अवस्था....

या अवस्थेतून

बाहेर पडण्याचा

प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो

अगदी #आत्महत्यासुद्धा.

                       _दत्तात्रय उदारे.