शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

#चिक्कीवाला

 

 

बालपणीचा काळ सुखाचा;

असं आज म्हणावसं वाटतं.

कारण खंत कशाची असते

तर आपल्याकडे जे नाही त्याची.

अप्रूप कशाचं असतं

तर जे खूप प्रतिक्षेनंतर

आपल्याला मिळालंय त्याचं.

दुःख कशाचं असतं

तर आपल्याकडं असलेलं

गमावलं त्याचं.

ऐन पंचेचाळिशीत बघा बरं डोकावून.

तुम्हाला दुःख आणि खंत वाढलेल्या दिसतील;

अगदी खात्रीने सांगतो.

बालपण गमावलेलं आहे;

म्हणून त्याचं दुःख आहे.

आणि

वरकडी अशी की;

त्याचीच खंतही आहे.

कारण

आज ते आपल्याकडं नाही.

 

मग

आपल्या हाती काय आहे…?

तर फक्त आठवणी.

अर्थात त्या काळात त्या रम्य नव्हत्या;

म्हणूनच कधी एकदा मोठ्ठा होतो

याची घाई झालेली होती.

आठवून पहा

त्याकाळात मोठ्ठं” होण्याची फार घाई होती.

मोठं झाल्यावर

समजत गेलं की;

बाबा हे वाटतं तेव्हढं सोपं प्रकरण नाही.

 

"मुठीतली रेती

आणि

मिठीतली xxx

सुटत चालली की माणूस हळवा होतो."

 

हक्कानं प्रत्येकाला रमायला

आवडणारी जागा म्हणजे बालपण.

खूप जुना काळ आहे.

तेव्हा मी खूप लहान होतो...

त्यावेळी सायकलवर

एक “चिक्की विकायला माणूस यायचा;

पोषाखावरुन आगळावेगळा भासायचा

रेगाळ्या कापडाचा पायजमा

आणि

त्याच कपड्याचा शर्ट

डोक्यावर गोंड्याची टोपी;

सोबतीला बांबू बांधलेली सायकल

आणि

त्या बांबूला असणारी रंगीत चिक्की.

अंगात असलेली कला

तो चिक्कीतून चितारायचा.

कामठीवर चिक्की चिकटवून

सुंदर प्राणी पक्षी बघताबघता

त्या कामठीवर तयार व्हायचे.

मुलं फर्माईश करायचे माकड...

की डोक्याला गिरकी घेत

गोंडा फिरवत फिरवत

चिक्की आकार घ्यायला लागायची.

क्षणात कामठीला हाताने धरलेलं

माकड दिसायला लागायचं...

तोवर दुसरा मुलगा चिमणी म्हणायचा;

केलेली फर्माईश

आणि

उत्कंठा वाढवणारे क्षण

चिमणीला मूर्त रुप देऊन जायचे...

मोर,गाय,बैल यापुढची फर्माईशच नसायची.

फारसे पैसे घरुन कुणाला मिळतच नसायचे.

आणि रडून पडून हट्ट तेव्हा करता येत नसायचा

कारण असा हट्ट म्हणजे महायुद्धाची

तात्कालिक कारणं असायची.

त्यामुळे तेंव्हाचे हट्टही समजदार असायचे.

बरीचशी गर्दी बघ्यांची असायची.

कलाकृती बघण्याचा आनंद

मात्र “मोफत” असायचा.

त्यामुळे चिक्कीवाल्याच्या मागे

या गल्लीतून त्या गल्लीत मुलं जायची.

कधीतरी;

आई-वडिलांना वाटले

तर पैसे मिळायचे

अशावेळी “अप्रूप” आडवे यायचे.

तयार केलेले आवडीचे

प्राणी पक्षी तासन्तास चोखले जायचे.

अशावेळी घरातील

कोणीतरी ओरडायचे

मग गडबडीने तो प्राणी पक्षी

एकदम “गट्टम” केला जायचा.

आता काळ बदलला

आणि

बदलत्या काळाबरोबर

रेगाळया कपड्यांचा तो चिक्कीवालाही

हळूहळू विरघळत गेला.

तो कधी नाहीसा झाला कीं;

अंतर्धान पावला कुणाला आठवतच नाही.

तो आजही भेटतो फक्त आठवणीतच.

काळाला कधी नकळत पंख फुटले

कळलंच नाही.

पण पंखावरचे रंग मात्र मागे ठेऊन

फुलपाखरासारखे हे आगळेवेगळे

बालपणीचे सोबती

कधी अनंतात विलीन झाले;

कुणास ठाऊक.

 

                     @जीवनयात्री

                     _©दत्तात्रय उदारे.



                                            {छायाचित्रे गूगलवरुन साभार.} 






 

२ टिप्पण्या: