शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

#गणराय

 

#गणराय















 मन तर आजही आतुर असतं

गणरायाच्या आगमनाला.

लहानपणही असंच असायचं...

पोळा झाला की हुरहूर लागलेली असायची

ती गणेशचतुर्थीची...

पोळ्याला आणलेली बैलजोडीसुद्धा

तयारीत असायची...

बाप्पाच्या पुढे थाटात उभी राहायला...

         हरतालिकेची पूजा झाली की आईसोबत

खिचडीवर मारलेला येथेच्छ ताव आजही आठवतो;

पण ती खिचडीची चव मात्र आज येत नाही...

इतकंच काय पण गणरायाला आणायला गेलेलो

दादांचा (वडिलांना दादा म्हणायचो मी

आता माझी मुलं म्हणतात...

“कालाय तस्मै नम:”)

हात धरून...ते स्मरणात आहे;

अगदी काल परवा इतकं ताजं.

हट्टानं सकाळी लवकर आवरून

तयारीत असायचो तेव्हा...

आज मुलं असतात. इतकाच काय तो फरक...

पिढीचा...

        बोटाला धरुन आम्ही चालायचो;

आज मुलंही बोट धरतात

पण हाताला ओढतात...

आपलं जगणं तसंच पुर्वीसारखं...

“वडील म्हणतील तसं

आणि आता

लेकरं म्हणतील तसं...”

तेव्हा वाटायचं मोठ्ठी मूर्ती घ्यावी बाप्पाची...

पण म्हणायला तोंड उघडत नसायचं

आणि कधी म्हटलंच तर कुणी ऐकतही नसायचं.

आज ती राहून गेलेली सुप्त इच्छा

मुलांच्या आडोशाला राहून

भागवत असतो बिच्चारा

बाप नावाचा यकश्चित जीव.

त्यावेळी वडील ऐकत नसायचे

आता मुलं...

मागील पानावरुन पुढच्या पानावर क्रमश:...

आमची पिढी होती तिथेच राहीली...

घराच्या उंबऱ्यासारखी

“ना आत ना बाहेर...”            

यंदाचाही बाप्पा कोरोनाची झालर

घेऊनच आहे.

असं वाटलं होतं एखादी तरी

बाप्पाची मूर्ती  मास्क लावलेली दिसेल;

पण बाप्पा मात्र सुटला या जाचातून...

आम्ही भक्त मात्र मास्क सॅनिटायजर

अशी कसरत करुन

बाप्पाला सुखरुप घरी घेऊन आलो.

बघताबघता घरातलं वातावरण मंगलमय

होऊन गेलं...

सारेजण खुश...

 

गणपती विथ मोदक...

#बाप्पाला साकडं सोडव बाबा

या कोरोनापासून उभ्या विश्वाला...

 

                             _दत्तात्रय उदारे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा