बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

#वेळ



#वेळ:

 

वेळ आहे का वेळ

हल्ली कुणाकडेच नसलेली

पण

प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी गोष्ट

एव्हाना लक्षात आलेही असेल

आणि

नसेल आले

तर फार काही विचार करु नका

मी वेळेबद्दल बोलतोय.

आजूबाजूला बघा

जग कसं धावतंय

कुणाकडे साधी

दोन मिनिटेसुद्धा नाहीत फुरसतीची

की तो मोकळा श्वास घेईल.

घड्याळाची टिकटिकच

माणसाच्या हृदयाची

धडधड बनून गेलीय

इतका माणूस यंत्र बनलाय

हो यंत्रच बनलाय

भावभावनांचा दुरदूरवर

कसलाही त्याचा संबंध उरलेला दिसत नाही.

स्वप्न पाहणं ही मानवी प्रवृत्ती नक्कीच असेल

आणि

ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी

ऊर फुटेस्तोवर

करावी लागणारी धावपळ

ही दमछाक करणारी नक्कीच आहे.

त्यासाठी अथक परिश्रम 

घ्यावेच लागतात 

त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही हो….

पण

हे सगळं करत असताना

तुमच्यात लपलेला

एक कलासक्त माणूस 

जिवंत ठेवायला हवा 

हे विसरुन कसं जमेल..

आणि

समजा 

जर असा #सृजनशील माणूस 

तुमच्यातून #लोप पावला 

तर पाहिलेलं स्वप्न 

जेव्हा साकार होईल 

तेव्हा तुम्हाला तितका #आनंद होईल का

कारण 

आनंद #साजरा करायला 

फक्त तुम्ही एकटे 

कधीच #पुरेसे नसता 

हे लक्षात घ्या.

त्यासाठी एक 

जोडीदार,सखा, मित्र असावा लागतो..

त्यासाठी 

किंवा 

तो मित्र समजून घेण्यासाठी 

#वेळ खर्च करावा लागतो.

नाहीतर आपला आनंद 

क्षणिक ठरण्याची शक्यता 

नाकारता येत नाही.

मग आता लक्षात घ्या 

जर तुमच्यात दडलेला जीव 

खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी 

त्याला जरा वेळ द्यायला शिका.

त्याला हवी असलेली स्पेस द्या,

फुलायला लागणारा वेळ द्या 

कधीतरी त्याला

शहरी जीवनापासून 

दूर घेऊन जा 

स्वतःमध्ये डोकावण्याची संधी उपलब्ध करुन द्या.

पण

हल्ली हे होत नाही 

कारण #वेळ नाही ना… !! 

नाहीच का वेळ तुमच्याकडे ??? 

एकदा तुमचा दिनक्रम बघा.

टीव्हीसमोर तासन्तास बसता

मोबाईल अर्थात सोशल मिडियावरही तेच,

वायफळ गप्पाटप्पा यातही व्यस्त असता 

आणि

तरीही आपल्याला #वेळच नसतो नाही का…! 

मोबाईलमुळे माणूस माणसापासून दूर पळायला लागला.

कल्पनाविश्वात रमायला लागला

पण

त्यामुळे वास्तवात मात्र तो #एकटा पडायला लागला.

या एकटेपणातून येणारं 

#डिप्रेशन

त्याच्या अस्तित्वावरच घाला घालायला लागलं.

सगळं कसं अस्ताव्यस्त

आणि

हाताच्या बाहेर जात चाललंय

सगळ्या गोष्टी 

जर अशाच हाताबाहेर गेल्यावर 

आम्ही जागे होणार असू 

तर आपल्या वाट्याला फक्त 

उध्वस्तपणा येणार हे नक्की

आपण काही गोष्टी जाणूनबुजून केल्या पाहिजेत.

बोलते व्हायला शिकले पाहिजे 

एकमेकांशी संवाद साधला गेला पाहिजे 

कुठला तरी #कट्टा 

जवळ केला पाहिजे 

जेणेकरुन वेळ 

अर्थात असलेला वा काढलेला

आपल्याला मोकळेपणा देऊन जाईल. 

 

खूप पैशालाही महत्व देऊन

स्वास्थ हरवून आलेली श्रीमंती

तुमचं जगणं सुसह्य करेल 

असं वाटत असेल तर विसरुन जा.

पैसा साधनं देऊ शकतो 

समाधान आनंद नाही.

 

कारण

अजून तरी 

आनंद आणि समाधान 

विकणारी दुकानं थाटल्याचं 

ऐकण्या-पाहण्यातच काय 

पण स्वप्नातही दिसली नाहीत

भौतिक सुखं ही खूप गरजेची नक्कीच आहेत

मी तर बरेचदा असं म्हणत असतो की

आम्ही सुख शोधणारी माणसं आहोत 

#सुखलोलुप म्हणा हवं तर.

ते जिथ्थे मिळेल तिथ्थे आम्ही त्याच्या शोधात जातो.

आवडतील अशा गोष्टी करतो,

वेळ काढून मस्त एखाद्या टेकडीवर,डोंगरावर जातो 

त्या शांततेत 

मनाशी संवाद साधतो.

कधी सूर्योदय 

तर कधी सूर्यास्त 

अनुभवतो.

त्याच्याशी एकरुप होऊन

तल्लीन होऊन छाती फुगवून 

अगदी फुफ्फुसं भरुन

ताजी स्वच्छ 

आणि 

मनाला तजेला देणारी हवा 

भरुन घेतो

असा तो अवर्णनीय सोहळा अनुभवतो. 

 

निर्जीव गोष्टींत 

नाही सापडला तुम्हाला तर 

जिवंत माणसं 

तीही मनमोकळी आणि जीवाभावाची कमवा.

सहवास 

हा तर नक्कीच चमत्कार घडवेल तुमच्या आयुष्यात.

अशी #कसरत केली तरच

संतुलन साधले जाईल

आणि मनाची अवस्था ही

#आनंदाच्या डोही #आनंद तरंग 

अशी परस्परपूरक होऊन जाईल.

कसरत 

मुद्दाम म्हणालो कारण आज ही कसरतच ठरतेय...

अगदी तारेवरची म्हणालात तरी वावगं ठरु नये...

चला 

तर कधी वेळ मिळालाच तुम्हाला 

तर बोलत जाऊ प्रेमाचे चार शब्द

असलेला वेळ

छान #टाईमपास करत जाऊ

     

 

                      ©दत्तात्रय_उदारे.

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा