समय तू धीरे धीरे चल
जगणं हे आनंदाचं असावं तरच दिवसाचं सोनं होतं नाहीतर ते दिवस काढल्याचं प्रतीत होत असेल तर जीवन हे ओझं वाटायला लागतं. असं शेवाळलेलं आयुष्य जगण्यात कसला #राम. जगण्यात सगळा निसरडेपणा येत चाललाय;इतकं जपून पाऊल जर टाकायचं तर त्या जगण्याचा आनंद काय मिळणार. पावलापावलावर असलेल्या धोक्यातून आयुष्य जगण्याचा आनंद सतत धोक्याच्या सावटाखाली झाकोळला जात असेल तर असलं आयुष्य काय कामाचं. चाळिशीनंतर आयुष्य ओझं असल्यासारखं वाटतंय असं म्हणावं लागतंय. विशीत पंचविशीत त्याला आपण जगण्यातलं थ्रील वगैरे म्हणायचो;कदाचित वयाचा परिणाम हा विचारांवर होत असावा.वयाबरोबर शहाणपण येतं पण ते सगळ्यांनाच नाही हे जो तो दाखवत असतो तेही खूप घाईने.मानवी जीवनातली ही जी काही घाई आहे ना ती आपल्याला जिथं-तिथं आडवी येत असते.अगदी कशातही...!कपभर कॉफी प्यायचीय तर मस्त शांत बसा,चवीचा कडसरपणा तोंडात घोळवत एक एक घोट रिचवण्यात जी मजा आहे ना ती सांगून थोडीच कळणार आहे,त्यासाठी लागणारी रसिकता ही काही भाड्याने किंवा विकत मिळत नाही ती मुळातच असावी लागते किंवा ती निर्माण करावी लागते,बरं निर्माण करायचं म्हटलं तर तेही सहज शक्य नाही.आपल्यात असणारा कडवटपणा कडसरपणाला काही हातपाय पसरु देत नाही.कारण तोच [कडवटपणा] आपल्यात ठासून भरलाय ना... आता का...? म्हणून विचारू नका...कारण तो महाराष्ट्रीयन माणसात उपजतच असतो राव...जाऊद्या खूप विषयांतर झालं.तर आपण होतो कॉफी कशी चवीनं प्यायची सोडून ती घाईघाईनं घशाखाली ढकलायची आणि निघायचं.या ढकलण्यात काय हशील...कॉफी काही पोट भरायची वस्तू नाही पण तेच समाधान बरेचजण घेताना दिसतात.असो..तर नियोजित स्थळी पोचण्याची घाई आहे म्हणून असं होतं म्हणावं ना तर ही मंडळी नियोजित स्थळीसुद्धा निघायची घाई करणार कारण काय तर लवकर घरी पोचायचं असतं,यातून काय मिळतं तर काहीही नाही आणि मग अशी माणसं थकून जातात चिडचिड करतात.आता तरी लक्षात आलं असेल की यांचा स्थायीभाव असतो तो चिडचिडेपणा.आता या माणसाला रसिकता कशी शिकवायची म्हणूनच म्हणालो होतो कीं,ती उपजतच असावी लागते. आता रसिक बघा सगळं कसं N'जॉय करेल...थांबला ना कॉफी प्यायला तर कसा मस्त मजेत थांबेल क्षणभर आजूबाजूला नजर टाकेल त्यातल्यात्यात छानसं ठिकाण शोधेल मग तिथे जाऊन कॉफीची ऑर्डर देईल त येईपर्यंत मस्त खुर्चीला पाठ टेकवून डोळे मिटून क्षणभर दीर्घ श्वास छाती भरून घेईल...अगदी ५६ '' छाती नसेल तरीही...मग सावकाश डोळे उघडून प्रसन्न मुद्रेने वाट बघण्यातली मजा अनुभवेल जोडीला कुणी असेल तर मस्त गप्पागोष्टी म्हणा नाहीतर गुजगोष्टी म्हणा लगेच चालू...तोपर्यंत आपला प्याला कॉफीचा येतोच अगदी एक एक घोट घेत घेत अगदी गप्पीष्ट गप्पा चालू.याची अर्धी कॉफी पिऊन झालेली असते तर बाकीचे सगळं संपवून तयार असतात हा आताशी अर्ध्यात मग उरलेलीही तितक्याच निवांतपणे चाखणार...मग पुढचा प्रवास चालू नियीजीत स्थळी पोचल्यावरही तेच सगळं कसं निवांतपणे तिथून निघण्याची अजिबात घाई नाही.तोपर्यंत बाकीच्यांनी निघायचा घायटा लावलेला असतो.हा मात्र निवांतपणे सगळ्यांशी मस्त बोलतचालत राहणार,रमतगमत सगळं बघून घेत राहणार.गेलोच न आपण तर घाई कशासाठी करा...घरी जाऊन काय बाराचे लाख थोडीच होणार आहेत,जाऊन झोपायचंच तर आहे;मग जाऊ निवांत आणि झोपू एक दिवस थोडी कमी झोप झाली तर बिघडतं कुठं...!!ही रसिकता. आता अरसिक तो येणार बळंंच हे चेहऱ्यावरील भाव बघून कुणाच्याही लक्षात येणार चेहरा त्रासलेला सगळीकडे फक्त आणि फक्त उरकसरक की लगेच निघायची गडबड...सगळ्या गोष्टीत यांना फक्त त्रास होणार कॉफीला थांबले तर साखरच जास्त झालीय,उन्हाळा असेल तर फारच गरम होणार पावसाळा असेल तर त्याचाही त्रास हिवाळा असला की हवेत खूपच वाटणार असं जर होत असेल तर मग कसला ढेकळाचा आनंद मिळेल का हो... रोज तर आपण असतो घरात बाहेर पडल्यावर घ्या कि मजा निसर्गाची मुक्तपणे.ही माणसं म्हणतील का ''समय तू धीरे धीरे चल''... पण यांनी हे शिकायला हवं कारण आता आयुष्यानं वेग धरलेला तरी असतो किंवा वेग धरायला सुरुवाततरी केलेली असते.पटापट तारखा बदलत असतात दिवस महिने सरत असतात...यांच्या चेहऱ्यावर मात्र सदा बारा वाजलेले असतात नेहमी एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा...आयुष्यात थ्रील माहित नाही कधी आनंद नाही...आपली वेळ संपत चाललीय याचंं साधं भानसुद्धा नाही. सकाळचा सूर्योदय एखाद्या टेकडीवर जाऊन अनुभवा कधीतरी...कधीतरी संध्या अनुभवा त्याच टेकडीवर असेल जोडीदार तर घ्या त्यालाही सोबत हातातहात घेऊन अनुभवा सूर्योदय-सूर्यास्त एकमेकांच्या कमरेत हात घालून...अहो एक दिवस हे सगळं संपणार आहे.हे अक्षय्य थोडंच आहे.पौर्णिमेच्या रात्री घ्या तिचा हात हाती सोबतच्या चंद्राबरोबर आकाशातला चंद्रही निरखत बसा की...कोणता चंद्र ''नाही'' म्हणेल अशा क्षणी...जमलं तर गुणगुणा ना - ''समय तू धीरे s s s s s s s s s धीरे चल'' शेवाळलेले निसरडे क्षणसुद्धा तुम्हाला आनंद-थ्रील देऊन जातील...दिवस ढकलल्याचंच काय आयुष्य ओझं बनल्याचंही तुम्हाला कधी वाटणार नाही...तो सोहळा वाटेल आनंद साजरा करण्यासाठीचा.

_दत्तात्रय उदारे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा