मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

आता पुन्हा पाऊस येणार.............

 

आता पुन्हा पाऊस येणार,मग आकाश काळं निळं होणार,
मग मातीला गंध फुटणार ,मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार,
काय रे देवा.....
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,
मग लपवूनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार ,
नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतंच  कळलं  तर बरं ,
असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देणं घेणं नसणार..
काय रे देवा.....
मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार,
मग त्यात  एखादं जुनं गाणं लागलेलं असणार,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार,
मग साहीरनं ते लिहिलेलं असणार,
मग ते लतानी गायलेलं  असणार...,
मग तूही नेमकं आत्ता हेच गाणं  ऐकत असशील का?
असा प्रश्न पडणार,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार,
मग ना घेणं  ना देणं,
पण फुकाचे कंदील लागणार....
काय रे देवा.....
मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार..,
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या
आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार....,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार ,
मग ऊरी फुटुन जावसं वाटणार,
छाताडातून हृदय काढून त्या शुभ्र
धारेखाली धरावंसं वाटणार...,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार,
पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत राहणार,
पण बंद नाही पडणार,
काय रे देवा.....
पाऊस पडणार....
मग हवा हिरवी होणार..
मग पानापानांत
हिरवाई दाटणार,
मग आपल्या मनाचं पिवळं पान
देठ मोडून हिरव्यात शिरू पहाणार,
पण त्याला ते नाही जमणार,
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार,
मग ते ओशाळणार,
मग पुन्हा शरिराशी परत येणार,
सर्दी होऊ नये म्हणून देहाला
वाफ घ्यायला सांगणार,
चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये
कुडमुडलेलं आलं शोधंणार,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार,
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार,
मग तीच्या जागी ती असणार,
माझ्या जागी मी असणार,
कपातलं वादळ गवती चहाच्या
चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....
पाऊस गेल्यावर्षी पडला,पाऊस यंदाही पडतो..
पाऊस पुढच्या वर्षीही पडणार.... 
                                काय रे देवा.....
 

              सर्वांना अगदी हवाहवासा वाटणारा पाऊस.पावसाचं वातावरण असो व 

नसो पण साक्षात पाऊस उभा करण्याची ताकद या काव्यात आहे.पाऊस  

पडायला लागल्यावर  मन आजही हूरहूरतं.त्यात कमी जास्त असं कधीच 

काही नसतं.ते पाऊस न पडता अनुभवायचं असेल तर हे गाणं एकदा 

ऐका.तिच उत्कटता आजही तुम्हांला जाणवेल जी पूर्वी कधीतरी कॉलेज

 

जीवनात तुम्ही अनुभवली असेल.तितक्याच ओढीनं आजही मन गतकाळात 

धावून जाईल.पुन्हा एकदा ते दिवस मन जगून घेईल.फक्त एक लक्षात ठेवा  

एकांत मात्र असायला हवा.नाहीतर बऱ्याच गोष्टी चव्हाट्यावर मात्र येतील.  

               हल्ली आपण जगताना हातचं राखून जगायला शिकतो,मन मारू

आनंद लुटायचा प्रयत्न करतो.पण मग मात्र हेही नाही अन् तेही नाही असं 

होतं.आजही पाऊस पडतो पण आपण मात्र स्वत:ला पावसापासून वाचवण्याचा 

प्रयत्न करतो.भिजावं असं खरंच वाटत नाही का ? विचार स्वत:ला प्रश्न येऊ 

द्या खरं उत्तर बाहेर,करा प्रयत्न मनासारखं जगण्याचा.नाही हो तुम्हांला ते 

जमणार नाही कारण आपण आपली एक वेगळीच प्रतिमा घेऊन जगतो 

आहोत.ज्याला आपण इमेज म्हणतो.मुखवट्यांच्या या दुनियेत आपला 

मुखवटा उतरवता येतो का ते पहा.मनाचा हिय्या करून उतरवून टाका तो 

मुखवटा आणि लुटा कोसळणाऱ्या त्या पावसाचा आनंद. जमेल का 

आपल्याला ?

 

हाच प्रश्न सर्वात अगोदर असेल आपल्यासमोर.एवढ्या प्रश्नावर एकदा 

विजय संपादन करा. मग बघा पावसाची उत्कटता कशी जाणवतेय ती.मग मात्र पाऊस पडायला लागल्यावर तुम्हांला कोणीही रोखू शकणार नाही.तुम्ही 

भिजण्यासाठी कारणं शोधाल.जमलंच आठवायला तर  'ते'  निसटते स्पर्श 

आठवा,ज्यांची आठवण आल्यावर आजही मन सैरभैर होतं,अनामिक हुरहूर 

दाटून येते,मन भरून येतं. 

                 खरं सांगा कोणत्याही वयात जोडीदारासह भिजायला आवडेल... 

की नाही आवडणार.आवडणार नसेल तर राहिलं.आणि आवडणार असेल 

तर ......जमतं का भिजायला किंवा भिजतो का आपण ? कधी जोडीदाराला 

विचारलंय का  की "चल पावसात" जाऊ,अगदी चिंबचिंब भिजू.अहो मनात 

जरी  आलं तरी कावरंबावरं व्हायला झालं असेल कित्येकांना.मित्रांसोबत 

भिजले असू आपण मैत्रिणीसोबत भिजलात का ......? आजूबाजूला पाहू 

नका,फक्त स्वत:ला विचारा .....खंत  वाटेल तुम्हांला पण आता काय उपयोग 

असे म्हणून उष्ण हुंकार सोडून गप्प बसू नका.मैत्रीण नाही तर नाही 

जोडीदाराला साद घाला,तिलाही / त्यालाही आनंदच वाटेल.सगळ्या गोष्टी 

आताशा आपल्या हाताशी असतील निघा बाईकवरून रायडींगला,घ्या 

मनमुराद आनंद.आणि समजा नाहीच जमलं तर हे काव्य तरी ऐका........



                                                                                                        _ दत्तात्रय उदारे.

                                                                                                            

1 टिप्पणी: